Home Cities जळगाव जळगाव जिल्ह्यात आत्महत्यांचा प्रश्न गंभीर; प्रतिबंध व प्रबोधन समिती स्थापन करण्याची मागणी

जळगाव जिल्ह्यात आत्महत्यांचा प्रश्न गंभीर; प्रतिबंध व प्रबोधन समिती स्थापन करण्याची मागणी

0
29


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वाढत्या आत्महत्येच्या घटनांवर आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये मानसिक जागृती निर्माण करण्यासाठी विशेष ‘आत्महत्या प्रतिबंध व प्रबोधन समिती’ गठीत करण्यात यावी, अशी आग्रही मागणी भाजप जिल्हा महानगर चिटणीस तथा दक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष सपकाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. १० सप्टेंबर या ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिना’चे औचित्य साधून हे निवेदन सादर करण्यात आले.

जिल्ह्यात आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक प्रमाणात वाढत असून, जानेवारी २०२६ ते जून २०२६ या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४४३ नागरिकांनी आपले जीवन संपवले आहे. यामध्ये १६ ते २६ वयोगटातील तरुण व युवतींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. या वाढत्या घटनांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून समाजाचे मोठे सामाजिक, आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. ही केवळ वैयक्तिक समस्या नसून एक गंभीर सामाजिक आव्हान बनल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीत निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, निवृत्त न्यायाधीश, कायदेतज्ज्ञ, निवृत्त पोलीस अधिकारी, निवृत्त डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच महिला व बालविकास आणि संबंधित शासकीय विभागांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ही समिती शाळा, महाविद्यालये व ग्रामीण भागात जाऊन तरुणांमधील मानसिक तणाव, नैराश्य, कौटुंबिक व आर्थिक अडचणींवर योग्य मार्गदर्शन आणि प्रबोधन करेल.

कोणतीही समस्या ही आत्महत्येपेक्षा मोठी नसते आणि योग्य संवाद व समुपदेशनाने प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढता येतो, हा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर स्वतंत्र प्रबोधन समिती स्थापन झाल्यास तरुणांना योग्य मानसिक आधार व मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.

निवेदन देताना सोबत तृषाल सोनवणे, सतीश महाजन, राजू डोंगरे, कमलेश डांबरे, हरिओम सूर्यवंशी, बबलू सपकाळे, सौ पेंढारकर आदि उपस्थित होते.


Protected Content

Play sound