सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा शहरातील पवन नगर, निमजाई माता नगर आणि स्वामी समर्थ कॉलनी परिसरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून मूलभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे त्रस्त झाले आहेत. पिण्याच्या पाण्याची अनियमितता, गटारींमधील अस्वच्छता, घंटागाडीची गैरहजेरी आणि खराब रस्त्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत आज संतप्त रहिवाशांनी सावदा नगरपालिकेवर धडक देवून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पहायाला मिळाले.
यावेळी संतप्त नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरून जाब विचारला. नुकत्याच झालेल्या नवीन पाईपलाईनच्या कामावरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले. नवीन पाईपलाईन टाकूनही परिसरात पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेक ठिकाणी तर पाणी येणेच बंद झाले असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागून पाण्याची वाट पाहावी लागत आहे, असा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे, या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. पक्के रस्ते नसल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच गटारी तुडुंब भरल्याने परिसरात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसात या भागात मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचते, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होते.
कचरा व्यवस्थापनाची स्थितीही या भागात अत्यंत वाईट आहे. घंटागाडी नियमितपणे येत नसल्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, लहान मुले आणि वृद्धांमध्ये आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. वारंवार तक्रार करूनही नगरपालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
या गंभीर समस्यांकडे नगरपालिकेने तातडीने लक्ष न दिल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. आपल्या मूलभूत हक्कांसाठी नागरिक आता रस्त्यावर उतरले असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे