अवैध धंद्याविरोधात सावदा शहरात पत्रकार रमाकांत तायडे यांचे उपोषण

सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावदा शहर आणि परिसरात जोमाने फोफावत असलेल्या अवैध सट्टा, मटका, जुगार तसेच ऑनलाइन जुगाराच्या धंद्यांविरोधात आता आवाज उठू लागला आहे. या धंद्यांवर तात्काळ बंदी घालावी, या मागणीसाठी स्थानिक पत्रकार आणि स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे राज्य महासचिव रमाकांत तायडे यांनी सावदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

तायडे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, सावदा शहरातील तसेच परिसरातील विविध भागांमध्ये अवैध सट्टा आणि जुगाराचे व्यवहार उघडपणे सुरू असून, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तरुण पिढी सट्ट्याच्या जाळ्यात अडकून नाशाच्या दिशेने जात आहे. या अवैध धंद्यांमुळे सामाजिक व आर्थिक शोषण होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

पोलीस प्रशासनाने जर तात्काळ आणि प्रभावी कारवाई केली नाही, तर येत्या १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी, त्यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मात्र, या उपोषणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याचीही त्यांनी खबरदारी घेतल्याचे नमूद केले.

या निवेदनाची प्रत पोलीस महासंचालक, विभागीय पोलीस आयुक्त (नाशिक) आणि पोलीस अधीक्षक (जळगाव) यांनाही पाठवण्यात आली असून, आता सावदा पोलिसांसमोर कठोर कारवाई करून लोकांचा विश्वास जपण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. स्थानिक नागरिकांतूनही आता या मुद्द्यावर तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी सट्टा-जुगारमुक्त सावदा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. रमाकांत तायडे यांच्या या पुढाकारामुळे या अवैध धंद्यांच्या विरोधात एक नवा सामाजिक लढा उभा राहण्याची शक्यता आहे.

Protected Content