
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देहदान करणारे व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब हे समाजाचे खरे दूत असून, भावी डॉक्टर घडविण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ज्ञानदानाच्या या पवित्र कार्याला देहदानाची मौलिक जोड लाभत असल्याचे प्रतिपादन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले. ते डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅनाटॉमी विभागातर्फे आयोजित ‘देहदानकर्त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान सोहळा’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी देहदान करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रती वैद्यकीय महाविद्यालयातर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि स्व. गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. व्यासपीठावर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, डीएम कार्डिओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश मिश्रा, फिजिओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. उमाकांत चौधरी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, सीईओ डॉ. विजय बाविस्कर आणि अॅनाटॉमी विभाग प्रमुख डॉ. शुभांगी वाघ उपस्थित होते.
आपल्या प्रेरणादायी भाषणात डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, “जन्म आणि मृत्यू हे अटळ सत्य आहे. मात्र, मृत्यूनंतर देहदान करून समाजासाठी ज्ञानदानाचे मोठे उपकार केले जातात. शरीररचना शास्त्र हा वैद्यकीय शिक्षणाचा पाया आहे आणि हा पाया दृढ करणाऱ्या देहदानकर्त्यांमुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे.” तसेच त्यांनी सांगितले की, गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रदानासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. देहदानकर्ते हे समाजदूत असून त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान सुरेंद्र चौधरी, विनायक पाचपांडे, सुधाकर मोरे आणि चंद्रभागा ताई यांनी आपली मनोगते व्यक्त करताना देहदानकर्त्यांच्या कुटुंबांचा अभिमान व्यक्त केला. सुयश देशपांडे आणि पायल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तसेच अॅनाटॉमी विभागात देहदान प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्टाफचाही सन्मान करण्यात आला.
अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी सांगितले की, “देहदान करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबांचा सत्कार करण्याचा मान आम्हाला मिळाला हे आमचे मोठे भाग्य आहे. देहदान हे प्रेरणादायी आणि सामाजिक परिवर्तन घडवणारे कार्य आहे. प्रत्येकाने अशा समाजसेवेत सहभागी व्हावे.”
या अत्यंत भावस्पर्शी सन्मान सोहळ्यात एकूण ३८ देहदानकर्त्यांच्या कुटुंबीयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रत्येक कुटुंबीयास स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या समाजसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यशस्वीतेसाठी वैष्णवी वानखेडे, पियुष कुकडे, शेख शहीद, रजस पाटील, रहीम कुरेशी, दिग्विजय ठोंबरे, अर्चित व्यास, वंदना पाटील, जान्हवी भिरूड, गजानन जाधव, रोशन महाजन, गोपाल नांदुरकर आणि राजू धांडे यांनी परिश्रम घेतले.



