गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती आणि करिअर नियोजनावर मार्गदर्शन


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात जळगाव शहर पोलीस स्टेशनचे अंमलदार रवींद्र प्रल्हाद तायडे (दया) यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, करिअर नियोजन आणि जीवनातील शिस्त यांसारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

अंमलदार तायडे यांनी आपल्या संवादातून विद्यार्थ्यांना सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात सायबर क्राईम हे मोठे आव्हान बनले आहे. ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियावरील अपप्रचार, आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी सजग राहणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी विविध वास्तव उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना संभाव्य धोके समजावून सांगितले आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना स्पष्ट केल्या.

तायडे यांनी पुढे व्यसनमुक्तीचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “व्यसन कोणतेही असो – ते आयुष्य उद्ध्वस्त करते. व्यसनमुक्त समाज म्हणजे आरोग्यदायी समाज. विद्यार्थीच या बदलाचे वाहक बनू शकतात.” त्यांनी जीवनात खेळ आणि व्यायामाचे महत्त्व सांगत शारीरिक तंदुरुस्ती ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे नमूद केले. तसेच करिअर नियोजन करताना समाजातील योगदान व चारित्र्यनिर्मितीला समान महत्त्व द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या प्रा. विशाखा गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्रा. मनोऱमा, प्रा. स्वाती गाडेगोणे, प्रा. शिल्पा वाघमारे आणि प्रा. पायल हांडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन केले. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तायडे यांनी संयमपूर्वक उत्तर दिली आणि त्यांना वास्तवदर्शी दृष्टिकोन दिला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना, स्वयंशिस्तीचे महत्त्व आणि सुरक्षित डिजिटल जीवनाविषयी जागरूकता वाढल्याचे प्राचार्या गणवीर यांनी सांगितले. विद्यार्थी कल्याण विभागाच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, संस्थेच्या प्रबोधनात्मक उपक्रमांची मालिका पुढेही सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.