मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सुरु करण्यात आलेला ‘लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार’ हा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार वितरण सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा पुरस्कार मी सर्व देशवासीयांना समर्पित करतो. लतादीदी या स्वरसम्राज्ञी आहेतच, पण त्याबरोबरच ती माझी मोठी बहीण होती. प्रेम आणि भावनेचा ओलावा देणाऱ्या लतादीदीकडून मला मोठ्या बहिणीसारखे प्रेम मिळाले आहे. यापेक्षा जीवनातील मोठे सौभाग्य काय असू शकेल? आता रक्षा बंधनाचा सण येईल तेव्हा दीदी नसेल. पुरस्कार, सन्मान स्वीकारणे यांपासून मी जरा दूरच असतो. मात्र लतादीदीसारख्या मोठ्या बहिणीच्या नावाने हा पुरस्कार आहे आणि मंगेशकर कुटुंबाचा माझ्यावर हक्क आहे. म्हणून येथे येणे माझे कर्तव्य आहे.
या कार्यक्रमात मंगेशकर कुटुंबीयांसह राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.