आमदार किशोर पाटलांच्या जनसंवादाबाबत उत्सुकता शिगेला

0

पाचोरा प्रतिनिधी । आमदार किशोर पाटील हे आज जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडणार असून याबाबत उत्सुकता लागली आहे. ते यात नेमके काय सांगणार याकडे मतदारसंघातील जनतेसोबत विरोधकांचेही लक्ष लागून आहे.

पहिल्यांदाच घडणार

पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील हे आज सायंकाळी जनसंवाद हा कार्यक्रम घेणार आहेत. यात ते थेट जनतेच्या दरबारात आपल्या कामांचा आढावा प्रस्तुत करणार आहेत. खरं तर प्रत्येक लोकप्रतिनिधी विविध माध्यमांमधून आपल्या कामांची माहिती देत असतो. तथापि, थेट जनतेसमोर जाऊन आपल्या कामांचा लेखाजोखा मांडण्याचा हा प्रयत्न अनोखा असून पहिल्यांदाच असे होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

काल बोलणार ?

आमदार किशोरआप्पा पाटील यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक विषय मार्गी लावले आहेत. या सर्व कामांना एकाच ठिकाणी मांडून ते आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे मानले जात आहे. अर्थात या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते अधिकृतपणे इलेक्शन मोडमध्ये जाणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. अर्थात, पाचोरा-भडगाव मतदारसंघात आता रणधुमाळी सुरू होणार असून यामुळे या कार्यक्रमांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

विरोधक अलर्ट

दरम्यान, आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या जनसंवाद कार्यक्रमाकडे त्यांच्या राजकीय विरोधकांचेही बारकाईने लक्ष असेल ही बाब स्पष्ट आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील राजकीय क्षेत्रात अनेक प्रकारच्या विसंगती ठासून भरल्या आहेत. विशेष करून वरवर असणार्‍या युती वा आघाडीच्या पलीकडे येथे पडद्याआड अनेक अभद्र हातमिळवण्या करण्यात आल्या आहेत. आता आमदार किशोरआप्पा आगामी निवडणुकीसाठी शंखनाद करत असतांना त्यांच्या या कार्यक्रमावर विरोधक बारकाईने लक्ष ठेवणार असल्याची बाबदेखील स्पष्ट झाली आहे.

आमदारांचे आवाहन

दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी मतदारसंघातील जनतेला आवाहन केले आहे. यात म्हटले आहे की, पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेने सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पालन करून आपला विश्‍वासाला पात्र होण्याचा माझा अल्पसा प्रयत्न याबाबत आपण सोबत चर्चा करावी अनुभव मांडावेत आपले प्रश्‍न समस्या समजून घ्याव्यात दिलखुलास गप्पा मारत सहजीवनाचा आनंद घ्यावा म्हणून ३ फेब्रुवारी २०१९ आज रविवार रोजी दुपारी ४ वाजता निर्मल इंटरनॅशनल स्कूल भडगाव रोड पाचोरा जनसंवाद विकासाचा हिशोब बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याला उपस्थित राहून आम्हास उपकृत करावे ही नम्र विनंती असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी मतदारसंघातील मतदारांना केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!