अभ्यास करत नाही, मोबाईल मागतो म्हणून बापानेच मुलाची केली हत्या

सोलापूर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा । तुळजापूर रोडवर १३ जानेवारीला १४ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणात पित्यानेच आपल्या मुलाला संपवल्याचं समोर आलं होतं. वडिलांनी मुलाच्या शितपेयामध्ये विषारी पावडर टाकून त्याला संपवलं होतं. पित्याला अटक देखील करण्यात आली होती. बापानेच आपल्या पोटच्या मुलाला का संपवलं असा प्रश्न अनेकांना पडला होता. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुलगा अभ्यास करत नाही. नेहमी खोड्या काढतो आणि सतत मोबाईल मागतो या कारणासाठी वडिलांनी आपल्या मुलाला संपवल्याचं समोर आलं आहे. विजय सिद्राम बट्टू (४३) याला अटक करण्यात आल्यानंतर त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली होती. त्यामध्ये विजयने ही कबुली दिली आहे. त्याच्या या स्पष्टीकरणामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलिसांनी मुलाच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. २८ तारखेला पत्नीसोबत झालेल्या भांडणात विजय बट्टूने उडतउडत सांगितलं होतं की त्यानेच मुलाला मारलंय. त्यानंतर पत्नीचा संशय बळावला. तिने पोलिसात जाऊन यासंदर्भातील माहिती दिली. पोलिसांनी विजय बट्टूला अटक करत त्याची चौकशी सुरु केली होती.

सुरुवातीला तो पोलिसांशी सहकार्य करत नव्हता. उडवाउडवीचे उत्तरं देत होता. पण, पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी खाक्या दाखवताच तो बोलता झाला. आरोपीने अनेक खुलासे केले आहेत. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इतक्या क्षुल्लक कारणासाठी आपल्या मुलाची हत्या केलेल्या बापावर संताप व्यक्त केला जात आहे.

Protected Content