श्रीनगरच्या बाजारात पुन्हा दहशतवादी हल्ला : एक ठार

shrinager attack

श्रीनगर, वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा ग्रेनेडने हल्ला केला आहे. श्रीनगरच्या मौलाना आझाद मार्गावरील बाजारात सोमवारी (दि.४) दुपारी झालेल्या या हल्ल्यात एक जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत.

 

दहशतवाद्यांनी भरगर्दीच्या बाजारात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. सैन्य दल आणि पोलिसांकडून दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त मोहिम हाती घेण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाल चौक भागाजवळ असलेल्या बाजारात हा ग्रेनेड हल्ला करण्यात आला. हल्ला होताच, बाजारात एकच पळापळ झाली. स्थानिक नागरिक जीव वाचवायला सैरावैरा पळू लागले, दुकानांचा आसरा घेऊ लागले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या १५ दिवसांत दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे.

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवू पाहात आहे. मात्र, भारतीय सैन्य पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतीय सैन्याने आर्टिलरी गनद्वारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी शिबिरांवर हल्ला केला होता. या हल्ल्ल्यात पाकिस्तानचे खूप नुकसान झाले होते. या हल्ल्यात केवळ दहशतवादीच नव्हे तर पाकिस्तानी सैनिकही मारले गेले होते.

Protected Content