मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दौर्यात धुळे येथील एक तरूणाने घुसखोरी केल्याचे उघडकीस आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा नुकताच पार पडला. यात एका तरूणाने त्यांच्या ताफ्यात घुसखोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्याचे नाव हेमंत पवार असून तो धुळ्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आंध्रातील एका खासदाराचा पीए असल्याचे भासवून त्याने शाहा यांच्या ताफ्यात प्रवेश मिळविला होता. तो मोठ्या ऐटीत फिरत असल्याचे दिसून आले होते.
अमित शाहांनी दोन दिवसांच्या मुंबई दौर्यात सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर पक्षाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबोधित देखील केलं होतं. या दौर्यात संबंधित अनोळखी व्यक्ती शाहांच्या भोवती फिरत होता. संशय आल्यानंतर मंत्रालयातील एका अधिकार्यानं याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत त्या व्यक्तीला अटक केली आणि गिरगाव कोर्टासमोर हजर केलं. कोर्टानं याच व्यक्तीला म्हणजेच हेमंत पवार याला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. तर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भोवती सहजपणे फिरणार्या या व्यक्तीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.