गंगापुरी येथील ‘त्या’ बालकाचा मृत्यू बुडून झाल्याचे निष्पन्न

2drowned

जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील गंगापूरी येथील शिवाजी श्रीराम बारेला (वय-१०) या बालकाचा काल (दि.२३) सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यू झाला होता. त्यानंतर आपल्या मुलाला गावातील काही लोकांनी जुन्या वादातून विष पाजून मारल्याचा आरोप त्याच्या पित्याने केला होता. मात्र आज (दि.२४) येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट केले आहे.

 

या घटनेची अधिक माहिती अशी की, गंगापूरी येथील शिवाजी बारेला हा काल नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी आपल्या शेतामध्ये गेला होता. मात्र काही गुरे शेजारच्या शेतामध्ये घुसली व त्यांनी सोयाबीन पिकाचे नुकसान केले म्हणून शेतमालक असलेल्या तिघांनी शिवाजीला सूर नदीच्या काठावर नेऊन त्याच्या मुसक्या आवळून त्याला बळजबरीने विष पाजून त्याची हत्या केली असल्याचा आरोप शिवाजीचे वडील श्रीराम बारेला यांनी काल केला होता. या प्रकरणी पोलीसांनी तीन जणांना संशयीत आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. श्रीराम बारेला हे शेती व्यवसाय करतात, त्यांना चार मुली व तीन मुले पत्नी असा परिवार आहे.

शिवाजी नेहमीप्रमाणे जनावरे शेतात चारण्यासाठी घेऊन गेला, मात्र त्यातील काही जनावरे हे शेजारच्या सोयाबीन पेरलेल्या शेतामध्ये घुसून त्यांनी काही पिकाची नासधूस केली. यामुळे रागाच्या भरात शेतमालक कमोल वेरसिंग बारेला (वय ४०) रामदास गिलदार बारेला (वय ४४), अमोल बेरसींग बारेला (वय ४५) या तिघांनी श्रीरामच्या घरी जाऊन वाद घातला. दोघांमधे बरीच शाब्दिक चकमक झाली होती. त्यामुळे दुपारी २.०० वाजेच्या सुमारास या तिघांनी शिवाजी यास सुर नदीच्या पलीकडील काठावर गाठून त्याला बळजबरी फवारणीचे औषध पाजले, त्यावेळी शिवाजीची १२ वर्षाची बहीण रिंकू व त्याचा लहान भाऊ विक्रांत त्या ठिकाणी उपस्थित होते, असे श्रीराम बारेला यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले होते. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, आज मयत शिवाजीचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर कुठलाही विष प्रयोग केला गेला नसल्याची प्राथमिक माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी दिली आहे. तसेच शिवाजीचा मृत्यू पाण्यात बुडूनच झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अहवालाला पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनीही दुजोरा दिला आहे.

Protected Content