अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खानदेशातील अहिराणी भाषेचा जागर व्हावा या उद्देशाने आयोजित पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाची भव्य सुरुवात बळीराजा स्मारकाचे पूजन करून आणि ग्रंथ व अहिराणी सांस्कृतिक दिंडीने करण्यात आली. या दिंडीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात (अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरी) झाली.
बळीराजा स्मारकापासून सुरू झालेल्या या ग्रंथीदिंडीत पारंपरिक आणि लोकसंगीताचा संगम दिसून आला. कानबाई, तगतराव, विठोबाची वारी, ढोलताशांचा गजर, लेझीमच्या नृत्याने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. विशेषतः “आथानी कैरी, तथानी कैरी…कैरी झोका खाय वं…” या अहिराणी व आदिवासी गाण्यांवर रसिकांनी ठेका धरत दिंडीची शोभा वाढवली.
या भव्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, डी. डी. पाटील, के. डी. पाटील, साने गुरुजी महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, तसेच ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील आदींच्या उपस्थितीने संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
संमेलनाच्या निमित्ताने अहिराणी भाषेच्या संवर्धनाची गरज आणि तिच्या भविष्यातील वाटचालीबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा घडून आली. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव शामकांत देवरे, प्रा. अशोक पवार, डॉ. रमेश सूर्यवंशी, बाळासाहेब भदाणे, रणजीत शिंदे, वैशाली शेवाळे, अर्चना राजपूत आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाने खानदेशाच्या मातीत रुजलेल्या अहिराणी संस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे काम केले. पारंपरिक गीत-संगीत, लोककला आणि भाषेच्या अभिव्यक्तीने संपूर्ण वातावरण अहिराणी संस्कृतीच्या उत्सवात रंगून गेले.