यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल महसूल मंडळाचे स्वयंचलित हवामान यंत्र व केंद्र हे मोहराळा या गावाजवळ सदोष ठिकाणी लावण्यात आले. त्यामुळेच गेल्या वर्षी यावल महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे नुकसान होऊन देखील नुकसान भरपाई पासून वंचित राहिले. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अहवाल पाठवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व विम्याचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन आमदार अमोल जावळे यांनी केले ते शुक्रवारी हवामान केंद्राच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी आलेल्या जिल्हाधिकारी यांच्याशी बोलत होते.

शुक्रवारी यावल तालुक्यातील मोहराळा या गावाजवळ यावल महसूल मंडळाचे लावण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राची पाहणी करिता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे आले होते. त्यांच्यासोबत जिल्हा जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी हे देखील होते. तेव्हा या ठिकाणी रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना सांगितले की, प्रत्यक्ष स्थळ आपण बघा व कशा पद्धतीने सदोष ठिकाणी हे हवामान केंद्र आहे व या केंद्रात व्यवस्थित नोंद न झाल्यामुळे गेल्या वर्षी केळी पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही.
केळी पिकाचे नुकसान होऊन देखील शेतकरी नुकसान भरपाई व विम्याच्या लाभा पासुन वंचित राहिला. तेव्हा प्रशासनामार्फत या बाबत सकारात्मक अहवाल तयार करून पिक विमा कंम्पनी कडे पाठवण्यात यावा आणि शेतकऱ्यांना विमा रकमेची भरपाई मिळावी असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी पाहणी केली आहे. याप्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, शेतकरी निलेश गडे, व्यंकटेश बारी, मुकेश कोळी, सागर चौधरी सह आदींची उपस्थिती होती.
यावल महसूल मंडळाचे सदर स्वयंचलित हवामान केंद्र ज्या स्थळावर आहे. त्याचा प्रत्यक्ष पाहणीचा अहवाल, स्थळ निरीक्षणाचा अहवाल. आपण तातडीने विमा कंपनीकडे पाठवणार आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घ्यावा व नुकसान भरपाई पासून वंचित शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
मोहराळा या गावाजवळ स्वयंचलित हवामान केंद्रचे उभारले आहे. तिथे बाजूलाच एक नाला आहे. तर समोर वर्दळीचा मार्ग असून एक दरगाह देखील आहे. येथे दर्शना करीता येणाऱ्या लोकांची वर्दळ असते. एकूणच शासन नियमानुसार अशा ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र नको कारण त्यात सदोष नोंदी होऊ शकतात असा निकष असतो. तेव्हा हवामान केंद्राचे स्थळचं बदलण्यात यावे अशी आमची मागणी आहे. गेल्या वर्षी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान झाले. आणि सर्वच जिल्ह्यातील महसूल मंडळात याची नोंद झाली व संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला मात्र, सदोष नोंदी मुळे केळीचे नुकसान होवुन देखील यावल महसूल मंडळातील शेतकरी विम्या पासुन वंचित राहिले.