माढ्यात बेकरी व्यवसायिकाची निर्घृण हत्या

पंढरपूर वृत्तसंस्था । माढा तालुक्यातील शिराळ येथील एका बेकरी व्यवसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह टमटमसह जाळण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय मारूती काळे (वय ५०, रा. शिराळ, ता. माढा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते बेकरीचा व्यवसाय करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, संजय काळे हे शनिवारी सायंकाळी जेवण करून घराबाहेरील आपल्या अंगणात झोपले होते. शनिवारी मध्यरात्री ते रविवार पहाटेच्या दरम्यान ते मालवाहतुकीचे वाहन घेऊन, घरी कुणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडले होते.

काल, रविवारी शेवरे येथे उजनी कालव्याचा उजव्या बाजूचा रस्त्यालगत लोकांना एक वाहन पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसून आले. काही नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाला होता. चेहऱ्यावर धारदार शस्राने वार करून निर्घृणपणे हत्या करून मृतदेह वाहनासह जाळण्यात आला होता. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Protected Content