पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात एका ४० वर्षीय महिलेचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मारेकऱ्याने महिलेचा मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून दिला होता. ही क्रूर घटना बुधवार, २५ जून रोजी सायंकाळी ६:३० वाजता समोर आली. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत तपास करत, उंदीरखेडा (ता. पारोळा) येथील संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
कशी घडली घटना?
सुमठाणे शिवारातील सामाजिक वनीकरणाच्या जंगलात बुधवार, २५ जून रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास इंधवे येथील काही तरुण बकऱ्या चारून परत येत असताना त्यांना एका महिलेचा गोणीत टाकलेला मृतदेह आढळला. मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते आणि खून दोन दिवसांपूर्वी घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.
ओळख पटवून आरोपीला अटक:
या घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची पथके तातडीने कामाला लागली. पोलिसांनी सखोल चौकशी करत, मोबाईल लोकेशनच्या आधारावर मृताची ओळख पटवली. खून झालेल्या महिलेचे नाव शोभाबाई रघुनाथ कोळी (वय अंदाजे ४८ वर्ष), व्यवसाय घरकाम, रा. उंदीरखेडा (ता. पारोळा) असे निष्पन्न झाले. शोभाबाई यांचे पती रघुनाथ कोळी हे मुलाच्या तब्येतीमुळे अंकलेश्वर येथे गेले असल्याने त्या घरी एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने हा डाव साधला असावा, असा संशय आहे.
४८ तासांच्या आतच पारोळा पोलिसांनी संशयित आरोपीला शुक्रवार, २८ जून रोजी सायंकाळी ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे. या खुनामागे नेमके काय कारण आहे आणि यात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा उलगडा पोलीस तपासात होईल.
या संपूर्ण कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सानप, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, सहायक पोलीस निरीक्षक योगेश महाजन, उपनिरीक्षक अमरसिंह वसावे यांच्यासह हवालदार सुनील हटकर, डॉ. शरद पाटील, अभिजीत पाटील, महेश पाटील, संदीप सातपुते, अनिल राठोड, आशिष गायकवाड, मिथुन पाटील, विजय पाटील, चतरसिंग मेहर आणि महिला कर्मचारी सविता पाटील यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली.