मोठी बातमी : जळगावात शिवसेना-उबाठा व मनसेचे एकत्र आंदोलन !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे मराठीच्या मुद्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू असतांना जळगावात या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रीतपणे आंदोलन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उध्दव आणि राज ठाकरे एकत्र येणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूंकडून एकत्र येण्याचे अनेकदा संकेत देण्यात आले असले तरी याबाबत अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. राज्यात अलीकडेच पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सक्तीचा निर्णय घेण्यात आला असून याला शिवसेना-उबाठा आणि मनसे या दोन्ही पक्षांनी प्रखर विरोध केला असून यातूनच दोन्ही ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाची चर्चा होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा दिसून येत आहे. आज जळगावात देखील हेच चित्र दिसून आले.

आज हिंदी सक्तीच्या विरोधात जळगावमध्ये शिवसेना-उबाठा आणि मनसे यांनी आंदोलनाची हाक दिली होती. या अनुषंगाने दोन्ही पक्षांना राज्य सरकारचा निषेध केला. यानंतर दोन्ही पक्षांचे पदाधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जवळ आले. येथे या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रीत आंदोलन केले. याप्रसंगी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणल्याचे दिसून आले. तर या आंदोलनात पहिलीपासून हिंदीची सक्ती करणाऱ्या राज्य शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महानगराध्यक्ष एजाज मलीक हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह सहभागी झाले. याप्रसंगी शिवसेना-उबाठा पक्षाचे उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील, महानगराध्यक्ष शरद तायडे, मनसेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

राज्यात उबाठा आणि मनसे अधिकृतपणे एकत्र येण्याच्या आधीच जळगावात दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र आल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.