जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयासमोर आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास एका ६० ते ६५ वर्षीय वायोवृध्दाचा मयत स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांनी ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.
अधिक माहिती अशी की, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आज गुरूवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास एका अनोळखी ६० ते ६५ वर्षीय पुरूष वयोवृध्दाचा मयतस्थीतीत मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, त्यांच्याजवळ ओळख पटविण्याचे कोणतेही साधन मिळून न आल्याने अनोळखी म्हणून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता श्रीमती डॉ. भंगाळे यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, अंगावर लाल कलरचा शर्ट, पांढरा पायजमा आणि दाढी वाढलेली असे मयताचे वर्णन असून ओळख पटविण्याचे आवाहन जिल्हा पेठ पोलीसांनी कळविले आहे. डॉ. भंगाळे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.