यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सावखेडा सीम जवळील निंबादेवी धरणात बुडून बेपत्ता झालेल्या जळगाव येथील तरुणाचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी शोधमोहिमेत सापडला आहे. रामेश्वर कॉलनी, जळगाव येथील जतीन अतुल वार्डे (वय १८) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली होती. जळगाव येथील रामेश्वर कॉलनी भागातील आठ तरुण सुट्टी असल्याने निंबादेवी धरणावर फिरायला आले होते. दुपारी ३ वाजता निघालेले हे तरुण सायंकाळी ४:३० च्या सुमारास धरणावर पोहोचले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काही तरुण धरणातील पाण्यात अंघोळीसाठी उतरले. मात्र, जतीन वार्डे अचानक खोल पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्याचा इतर तरुणांनी प्रयत्न केला, पण कुणालाही पोहता येत नसल्याने ते खोल पाण्यात जाऊ शकले नाहीत.
घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि त्यांचे सहकारी सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार अर्शद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी, संतोष पाटील या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अंधार झाल्याने शोधमोहीम थांबवावी लागली होती. तिसऱ्या दिवशी मारुळ आणि लोसनबर्डी येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने धरणात शोधमोहीम राबवण्यात आली, आणि अखेर जतीन वार्डेचा मृतदेह मिळून आला. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रशांत जावळे यांच्याकडून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. या घटनेमुळे रामेश्वर कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे.