Home क्राईम अडावद येथे दुष्काळाच्या चिंतेत शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

अडावद येथे दुष्काळाच्या चिंतेत शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

0
9


अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने यंदाच्या हंगामातील अनिश्चित पाऊस आणि आर्थिक संकटाच्या चिंतेतून टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वरचा माळी वाड्यातील शेतकरी गोविंदा चैत्राम गंभीर (६५) यांनी राहत्या घराच्या छतावरून उडी घेत जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गोविंदा गंभीर हे पाच एकर कोरडवाहू शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी होते. मागील वर्षी त्यांनी शेतात मका पिकाची लागवड केली होती. मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर्षी चांगले उत्पादन मिळेल आणि मागील नुकसान भरून काढता येईल, या आशेने त्यांनी कर्ज काढून शेतीची तयारी केली होती.

मात्र पावसाने दडी मारल्याने त्यांची चिंता वाढली होती. हंगाम हातातून जाईल का, घेतलेले कर्ज कसे फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या विचारांनी ते मानसिक तणावाखाली होते. याच विवंचनेतून त्यांनी  टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. १४ जून रोजी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास गोविंदा चैत्राम गंभीर यांनी राहत्या घराच्या गच्चीवरून उडी घेतली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेनंतर शेतकऱ्याचा मृतदेह चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. १५ जून रोजी सकाळी दहा वाजता शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी बारा वाजता अडावद येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या अडचणी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.


Protected Content

Play sound