जळगावच्या मेहरूण तलावात आढळला महिलेचा मृतदेह

d9ccad6f a216 4676 ab61 94a2fc0b773e

 

जळगाव प्रतिनिधी । शहरालगत असलेल्या मेहरूण तलावात एका 50 वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. दरम्यान, ही आत्महत्या आहे की घातपात?, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

याबाबत माहिती अशी की आशा दिलीप कुमार नथानी (वय 50, रा. गायत्री नगर) ह्या आपल्या पती व मुलासह राहतात. पतीचे फिरते बाजाराच्या दुकानात काम करतात. तर मुलगा विवेक हा खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्यांच्याच घराच्या वरच्या मजल्यावर त्यांची मोठी बहीण मनीषा नथनी ह्या देखील राहतात. आज दुपारी १२ वाजता आशा नथानी या कोणाला काहीही न सांगता घरातून बाहेर पडल्या. त्यावेळी त्यांचे पती वावडदा येथे गेले होते. तर विवेक हा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला होता. दरम्यान, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मेहरूण तलावात पोहणारे समाधान जगदीश नाईक आणि शरद कृष्ण वंजारी यांना एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. तर व्हाट्सअप ग्रुपवर फोटो वरून मयत महिलेच्या भाच्याने हा फोटो ओळखला. त्यानंतर आशा नथानी यांची ओळख पटली. घटनेची माहिती मिळताच गायत्री नगर परिसरातील नागरिकांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत ही आत्महत्या आहे की, घातपात याबाबत माहिती मिळू शकली नव्हती.

Protected Content