ओव्हरटेक करण्याच्या नादात पिकअप वाहन पलटी; महिलेचा मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी पिकअप वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघातप्रकरणी सोमवार ३० ऑक्टोबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बदरे आलम शमीम मोहम्मद शहा (वय-४०) रा. धुळे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १६ ऑक्टोबर रोजी ते आपल्या बहिण सारजान बानो अजिज अहमद शाह, पत्नी साफिया व मुलांसोबत चारचाकी पिकअप वाहन (क्रमांक एमएच १९ सीवाय ९७४१) ने जळगाव येथून धुळे येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी वाहन हे धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावाजवळून महामार्गावरून जात असतांना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास  चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप गाडी रस्त्यावर पलटी झाली.

या अपघातात सारजान बानो अजिज अहमद शाह या महिला गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर इतर सर्वजण गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पिकअप वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील करीत आहे.

Protected Content