स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे घंटानाद आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरात खाजगी लेआउटमध्ये कोणतेही घर वा रहिवासी वस्ती नसताना, पूर्णपणे मोकळ्या प्लॉटिंगवर विद्युत संच मांडणीचे काम हे एनएससी या शासकीय योजनेतून करून जवळपास १५ लाखांचा निधी गैरप्रकाराने वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे. याच भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य अभियंता यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

मुक्ताईनगर महावितरण विभागातील विद्यमान प्रभारी कार्यकारी अभियंता यांनी एनएससी शासकीय योजनेचा गैरवापर करून संबंधित खाजगी लेआउटसाठी निधी मंजूर केला. विशेष बाब म्हणजे या लेआउटमध्ये सध्या कोणतेही वास्तव्य नसून तेथे फक्त मोकळी प्लॉटिंग आहे. असे असतानाही महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या माध्यमातून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा निधी मंजूर केला, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. यामुळे महावितरणच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असून हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यांनी या लेआउटचे इस्टिमेट 1.3 योजनेअंतर्गत तयार केले होते, ज्यात संपूर्ण खर्च लेआउटच्या मालकाकडून घेण्याची तरतूद आहे. मात्र, प्रभारी कार्यकारी अभियंता आणि इस्टिमेट मंजूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हे इस्टिमेट एनएससी योजनेअंतर्गत मंजूर करून शासकीय निधीचा गैरवापर केला. मुक्ताईनगर विभागात अन्य लेआउटसाठी 1.3 योजनेचा वापर करण्यात आला असताना फक्त एका लेआउटला वेगळा न्याय का दिला गेला, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. यामागे कोणते आर्थिक षड्यंत्र आहे, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वीही तात्कालिक कार्यकारी अभियंत्यांनी अशाचप्रकारे शासकीय योजनेतून खाजगी लेआउट मंजूर केल्यामुळे विभागीय चार्जशीट दाखल झाली होती. मात्र, मुख्य कारवाई अद्याप प्रलंबित आहे. आता या नवीन प्रकारातील प्रभारी कार्यकारी अभियंत्यांवर गुन्हे दाखल होण्यासाठी किती वर्ष लागणार, असा प्रश्न उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन उभारले.

यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमोद सौंदळे, गजानन सोनवणे, उत्तम जुमडे, श्रावण धाडे, सुरेश पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

Protected Content