आंदोलनकर्त्या खासदारांनी उपसभापतींचा चहा नाकारला

 

नवी दिल्ली :वृत्तसंस्था । कृषि विषयक विधेयकांवर राज्यसभेत गोंधळ घातल्यानंतर निलंबित करण्यात आलेले आठही खासदार रात्रभर महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलनावर बसून राहिले. सोमवारी सभापती व्यंकय्या नायडू यांनी संसदेत गोंधळ घालण्यासाठी आणि उपसभापतींसोबत गैरवर्तन करण्यासाठी निलंबित केलं होतं. सोमवारी दुपारपासून धरणे आंदोलनावर बसलेल्या या खासदारांच्या भेटीसाठी मंगळवारी सकाळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह स्वत: पोहचले. हरिवंश यांनी ‘गांधिगिरी’ करत या खासदारांसाठी आपल्यासोबत चहादेखील आणला होता. परंतु, विरोधी पक्षाच्या खासदारांनी हा चहा पिण्यासही नकार दिल्यानं त्यांची ही गांधीगिरी फसली. यावेळी त्यांनी नाराज खासदारांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो फोल ठरला.

राज्यसभेत झालेल्या गोंधळामुळे आपण दु:खी झाल्याचं सांगत उपसभापती हरिवंश यांनी एका दिवस उपवासावर बसणार असल्याचं जाहीर केलंय. उपसभापतींनी या संदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून याबद्दल माहिती दिलीय.

निलंबित खासदारांमध्ये डेरेक ओ’ब्रायन (तृणमूल काँग्रेस), संजय सिंह (आम आदमी पक्ष), राजीव सातव (काँग्रेस), के के रागेश (सीपीआई-एम), रिपुण बोरा (काँग्रेस), डोला सेन (तृणमूल काँग्रेस) या खासदारांचा समावेश आहे.

Protected Content