एसबीआयच्या गृहकर्जावरील व्याजदर घटणार; १ जानेवारीपासून नियम लागू

sbi bank

मुंबई वृत्तसंस्था । स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सोमवारी गृहकर्जावरील बाह्य बेंचमार्क आधारित दर (ईबीआर) दर २ बेस पॉइंटने कमी केले आहेत. ०.२५ टक्क्यांनी हे स्वस्त झाले आहे. यापूर्वी एसबीआयचा गृहकर्जाचा दर सर्वात कमी ८.१५ टक्के होता. आता नवीन दरांनुसार १ जानेवारी २०२० पासून ग्राहकांना गृह कर्ज घेतल्यास ७.९० टक्के व्याजदर लागणार आहे. नव्या वर्षात हक्काच्या घराचे स्वप्न बघणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय स्टेट बॅंकेने ही गुडन्यूज दिली आहे.

बॅंकांकडून अंतर्गत मानकानुसार (इंटर्नल बेंचमार्क) गृहकर्जाचा दर ठरवला जातो. जवळपास ९० टक्के कर्ज बदलत्या व्याजदारावर आधारित आहेत. २० वर्ष मुदतीच्या दीर्घकालीन कर्ज योजनेत ठराविक कालावधीनंतर व्याजदर आढावा घेतला जातो. व्याजदरकपातीने नव्याने गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आणि उद्योजकांना ०.२५ टक्के कमी व्याजदराने कर्ज मिळेल. या कपातीनंतर SBIचा नवीन गृहकर्जाचा दर ७.९० टक्के झाला आहे. यापूर्वी तो ८. १५ टक्के होता. ‘आरबीआय’चा रेपो दर ५. १५ टक्के असून त्यात २.६५ टक्के मार्जिन धरून SBIने व्याजदर निश्चित केला आहे. यात ०.१० ते ०.७५ टक्के अतिरिक्त प्रिमियम भार बँकेकडून आकारला जातो. या महिन्याच्या सुरुवातीलाच SBIने ‘मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट’मध्ये (एमसीएलआर) ०.१० टक्के कपात केली होती. यामुळे बॅंकेचा एक वर्ष मुदतीचा ‘एमसीएलआर’ ७.९० टक्के झाला आहे. चालू वर्षात सलग आठव्यांदा SBIने एमसीएलआर दर घटवला आहे. ऑक्‍टोबरपासून स्टेट बॅंकेने बाह्य मानकावर (एक्‍स्टर्नल बेंचमार्क) आधारित कर्जदर निश्‍चितीचे धोरण लागू केले आहे. यासाठी रिझर्व्ह बॅंकेचा रेपो दर एक्‍स्टर्नल बेंचमार्क म्हणून ग्राह्य धरण्यात आला आहे. सध्या रेपो दर ५.१५ टक्के आहे.

Protected Content