शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरला, तर कॉलेजेस दिवाळीनंतर सुरु – सामंत

मुंबई । महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कॉलेज कधी सुरु होणार यासंदर्भात माहिती दिली आहे. यंदाचं शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरु होईल. मात्र, प्रत्यक्षात कॉलेज दिवाळीनंतर सुरु होतील, असं सामंत म्हणाले.

येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यातल्या शाळा सुरू होणार आहेत. मात्र महाविद्यालये कधी सुरू होणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, आता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरू करण्यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना सामंत म्हणाले, करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ती काळजी घेऊनच महाविद्यालये सुरू करण्याचा आमचा विचार आहे. मात्र, पटसंख्या हाच महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी कशा पद्धतीचा फॉर्मुला तयार करायचा ह्यावर विचार करुनच कॉलेज सुरू करायची आहेत. १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. मात्र, मागच्या वेळी गैरसमज असा झाला की, तेव्हापासून महाविद्यालयं सुरू होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून महाविद्यालयं सुरू करावीत असं यूजीसी आणि एआयसीटीईचं म्हणणं आहे. मात्र आपल्याकडे त्या काळात दिवाळीचा सण असल्याने त्या काळात महाविद्यालये सुरू करता येणार नाहीत. त्यानंतरच कदाचित कॉलेज सुरू करण्यात येईल. आम्ही त्या विचारात आहेत.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात पूरपरिस्थिती आहे. अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देता आली नाही. त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सीईटीच्या परीक्षा झाल्याशिवाय, त्याचा निकाल लागल्याशिवाय कॉलेज सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे ही परीक्षा लांबली तर महाविद्यालयं सुरू करण्याची तारीख अजून पुढे जाईल.

 

Protected Content