पाचोऱ्यात अवैध बायोडिझेलचा साठा जप्त ; पोलिस व पुरवठा विभागाची संयुक्त कारवाई

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील जारगांव चौफुली जवळ एका दुकानातून १ हजार ६०० लिटर अवैध बायोडिझेलचा साठा जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे पाचोरा पोलिस व पुरवठा विभागाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील जारगांव चौफुली नजीक सय्यद सलिम यासीन रा. नुरानी नगर, पाचोरा यांचे दुकान आहे. आज दि. ३० रोजी सदरील दुकानात अवैध बायोडिझेलचा साठा असल्याची माहिती गोपनीय सुत्रांकडून मिळाल्याने पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, विकास पाटील, गोपनीय विभागाचे पोलिस काॅन्स्टेबल सुनिल पाटील, किशोर पाटील, विनोद बेलदार, निलेश गायकवाड, योगेश पाटील, दिलीप सुरवाडे, पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक उमेश पुरी, अव्वल कारकून एस. एस. पाटील, शिव पाटील या पथकाने घटनास्थळी जावून तपासणी केली असता अवैध बायोडिझेलने भरलेले २०० लिटरचे ८ बॅरल आढळुन आल्याचे उघडकीस येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली.

सदर घटनास्थळी आढळुन आलेले १ हजार ६०० लिटर बायोडिझेल हे बाजार भावानुसार सुमारे १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे असल्याचे यावेळी तपासणी निष्पन्न झाले आहे. यावेळी पथकाने घटनास्थळा संयुक्त पंचनामा करुन अवैध साठवलेल्या बायोडिझेलचे नमुने ताब्यात घेऊन सदरील दुकान सिल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पाचोरा पोलिसात पुरवठा निरक्षक उमेश पुरी यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर अवैध साठा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पाचोरा पोलिस व पुरव विभागाच्या संयुक्त कारवाईचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!