यावल, प्रतिनिधी | येथील पंचायत समितीकडुन सेस फंडातून गाडऱ्या ते जामन्या रस्त्यावर विसावा निवारासाठी पत्री सेड करणे काम मंजूर झालेले असताना ते काम न करता संबंधिताने ४८ हजार रुपयाचा धनादेश काढून अपहार केल्याची तक्रार भरत छत्तारसिंग बारेला यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
भरत बारेला यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, यावल पंचायत समितीच्या सेस फंडातून गाऱ्या ते जामनेर रस्त्यावर विसावा, निवारासाठी पत्री शेड करणे असे काम मंजूर झालेले होते. याकामाची प्रशासकीय मान्यता २०१७ मध्येच मिळाली असून या कामासाठी ५१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती व आहे. भरत बारेला यांनी तक्रारीत म्हटले आहे की ते जामन्या येथील रहिवासी असून या रस्त्याचे माझे नेहमी जाणे येणे आहे परंतु आजतागायत या रस्त्यावर असे कोणतेही विसावा निवारा साठी पत्री शेड उभे करण्यात आलेले नाही, परंतु सदर शेडच्या कामासाठी ग्रामपंचायत गाडऱ्या यांना मात्र पंचायत समिती यावल तर्फे दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी रुपये ४८ हजार ३१४ रूपयाचा चेक क्रमांक ५९८ पंचायत समितीने दिला आहे. सदर निधी यापूर्वी माजी पंचायत समिती सदस्य नागेश्वर साळवे यांनी सावखेडासिम येथील प्राथमिक शाळेच्या आवारा साठी तार कंपाउंडसाठी मंजूर केलेला होता, विद्यमान पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी हेतुपुरस्कर सावखेडासिम येथील प्राथमिक शाळेच्या आवारातील तार कंपपाऊडचे काम रद्द करून या कामात बदल करून हा निधी गाडऱ्या- जामन्या रस्त्यावर विसावा निवारासाठी पत्रिशेड करणे या कामासाठी घेतला. परंतु सदरचे काम प्रत्यक्ष न करताना परस्पर मंजूर रकमेचा अपहार झालेला आहे, तरी गटविकास अधिकारी यांनी तक्रारीची दखल घेउन सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी असे दिलेल्या निवेदनात भरत बारेला यांनी म्हटले आहे