नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचं आज लोकार्पण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण झालं. या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनादेखील निमंत्रण देण्यात आलं होतं. पण उद्धव ठाकरे यांचा आज नियोजित नाशिक दौरा असल्याने ते अयोध्येला गेले नाहीत. आपण अयोध्येला मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाहीत, पण नंतर नक्की जाणार, असं उद्धव ठाकरेंनी याआधीच स्पष्ट केलं होतं. तसेच अयोध्येला 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी आपण काळाराम मंदिरात दर्शनाला जाणार असल्याचं ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आलेलं. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब नाशिकच्या काळाराम मंदिरात श्रीरामांचं दर्शन घेतलं.
नाशिकच्या काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे यांनी सपत्निक पूजा केली. यावेळी पुजाऱ्यांकडून मंत्रोच्चार करण्यात आला. अतिशय मनोभावे श्रीरामांची पूजा करण्यात आली. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, त्यांचा भाऊ तेजस ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. नाशिकच्या काळाराम मंदिरात त्यांचा सत्कार करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब काळाराम मंदिरात पूजा केली. त्यानंतर काळाराम मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे गोदातीरी महाआरतीसाठी रवाना झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आले होते. मोदी यांनीदेखील नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली होती. यावेळी मोदींनी काळाराम मंदिराच्या परिसरात स्वत: साफसफाई केली होती. मोदींचा काळाराम मंदिरात साफसफाई करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आज उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. उद्धव ठाकरे खूप दिवसांनंतर आज नाशिकमध्ये आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसतोय.