नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात उध्दव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असून त्यांनी अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे याच प्रकरणात शिंदे गटाने आधीच सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केलेले आहे. यानंतर ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.
उध्दव ठाकरे गटाच्या याचिकेत निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव हिरावून घेण्याचा घेतलेला निर्णय लोकशाही मार्गाने घेतलेला नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. २०१८ची पक्षाची कार्यकारिणी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे आहे. पक्षाचे बहुतांश सदस्य आमच्या बाजूने आहेत. निवडणूक आयोगाने केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या आधारे निर्णय दिला आहे. हा निर्णय योग्य नाही, असा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे. मंगळवारपासून सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होत आहे. त्यामुळे उद्याच्या कामकाजात या याचिकेचा समावेश करण्यात यावा आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.