मला हॉस्पीटलमध्ये मारून टाकण्याचा रचला होता कट ! : आ. नितेश राणेंचा आरोप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ”पोलिसांनी अटक केल्यानंतर आपली अँजिओग्राफी करून यात औषध टाकून मारून टाकण्याचा कट रचण्यात आला होता” असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

आमदार नितेश राणे हे गेल्या अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. मध्यंतरी त्यांना एका प्रकरणात अटक करून नंतर सुटका देखील करण्यात आली होती. याच कालखंडाबाबत त्यांनी विधानसभेत बोलतांना धक्कादायक आरोप केला आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणात आ. राणे यांना पोलीस कोठडी सुनावली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे, कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात हलवले होते. त्या संदर्भ देत आमदार राणे म्हणाले की, आपली अँजिओग्राफी करणे गरजेचे असल्याचा आग्रह डॉक्टर माझ्याकडे करु लागले होते. यावर आपण त्यांना मला आता असे काही वाटत नसल्याचे उत्तर दिले. माझे बीपी लो होते हे मला जाणवत होते. पण डॉक्टरांनी अँगिओग्राफीचा आग्रह धरला. याप्रसंगी काही कर्मचार्‍यांनी मला येऊन सांगितले की, हे सीटी एन्जो करु नका. हे करण्यासाठी शरीरात इंक टाकावी लागते. ही इंक टाकून तुम्हाला मारुन टाकण्याचा प्लॅन आहे. यामुळे आपण याला साफ नकार दिला.

दरम्यान, या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी केली. तसेच आपला बीपी, शुगर लो असतानाही रात्री अडीच वाजता २०० पोलिस आपल्याला डिस्चार्ज करण्यासाठी पाठवण्यात आले होते, या प्रकरणी गृहमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवे असे असेही ते म्हणाले.

Protected Content