जितेंद्रसिंग परदेशी यांना जपान सरकारकडून प्रशस्तीपत्र

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथील सुपुत्र व मुंबई महानगरपालिकामध्ये उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी पदावर कार्यरत असलेले जितेंद्रसिंग परदेशी यांना जपानचे मुंबईतील वाणिज्य दूत डॉ. फुकहोरी यासुकाटा यांनी मुंबईतील वृक्ष लागवडीसाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

मुंबईत जागेची मोठी समस्या आहे त्यामुळे वृक्षारोपण करणे हे मोठे जिकरीचे कार्य जितेंद्रसिंग परदेशी यांनी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ६४ ठिकाणी नागरी वन निर्मिती अंतर्गत चार लाखाहून अधिक वृक्षलागवड करण्यात आली. यात ४५ ठिकाणी जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त वृक्ष बहरली असून कमी जागेत जास्त वृक्ष लागवड करण्याची संकल्पना जपानी शास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी शोधली असून मुंबईत सदर पद्धतीचा उत्कृष्ट वापर जितेंद्रसिंग परदेशी यांनी केला. यामुळे त्यांना जपान सरकारने प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला.

याआधी परदेशी यांना उत्कृष्ट अधिकारी, बाळासाहेब ठाकरे गुणवंत अधिकारी, लंडनच्या अर्बोरीकल्चर मासिकात जैविक पध्दतीने झाडांचे संवर्धन करण्याविषयी केलेले शास्रोक्त लिखाण यासंदर्भात अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. जितेंद्रसिंग परदेशी यांचे नगरदेवळा ग्रामस्थांसह परिसरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Protected Content