कसोटी क्रिकेटला १५० वर्षं पूर्ण; इंग्लंड-ऑस्ट्रेलिया डे-नाईट सामना होणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | क्रिकेटच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा गाठताना, कसोटी क्रिकेटला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जगातील सर्वात जुने प्रतिस्पर्धी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया एक ऐतिहासिक कसोटी सामना खेळणार आहेत. हा दिवस-रात्र सामना ११ ते १५ मार्च २०२७ दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड  येथे होणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे की, या ऐतिहासिक सामन्यासाठी गुलाबी चेंडूचा वापर केला जाईल. १८७७ मध्ये झालेली पहिली कसोटी आणि १९७७ मध्ये कसोटी क्रिकेटच्या १०० वर्षांच्या पूर्ततेसाठी खेळवलेली कसोटी लाल चेंडूने झाली होती. मात्र, या वेळी गुलाबी चेंडूचा समावेश करून एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग यांनी या विशेष सामन्याबद्दल उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले, “ही संधी क्रिकेटच्या वाढीस चालना देईल. एमसीजीमध्ये कसोटी क्रिकेटची १५० वर्षे साजरी करण्याचा हा सुवर्ण क्षण असेल. दिवस-रात्र कसोटीमुळे त्यात अधिक रोमांच येईल.”

महत्त्वाचे म्हणजे, हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चा भाग नसणार आहे. मात्र, २०२७ सत्रातील १२ कसोटी सामन्यांपैकी हा एक सामना असेल. या सत्रात ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरुद्ध ३, न्यूझीलंडविरुद्ध ३ आणि भारतात ५ कसोटी सामने खेळणार आहे. तसेच, ऑस्ट्रेलियन संघ त्या वर्षी अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड दौरा करेल आणि वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात भाग घेईल.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे माजी सीईओ निक हॉकले यांनी या ऐतिहासिक कसोटीबाबत ७ महिन्यांपूर्वीच माहिती दिली होती. सप्टेंबर २०२६ मध्ये त्यांनी सांगितले होते की, “मार्च २०२७ मध्ये एमसीजी येथे होणारा १५० वा वर्धापन दिन कसोटी हा क्रिकेटच्या सर्वोत्तम स्वरूपाचा एक अनोखा उत्सव असेल.”

१८७७ मध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी विजय मिळवला होता. विशेष म्हणजे, १९७७ मध्ये कसोटी क्रिकेटच्या १०० वर्षांच्या पूर्ततेनिमित्त याच मैदानावर झालेल्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे, २०२७ मध्ये हा इतिहास पुन्हा घडतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०३०-३१ हंगामापर्यंतचे कसोटी सामन्यांचे आयोजन निश्चित केले आहे. पुढील ७ वर्षे बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्नमध्येच होणार आहे, तर नवीन वर्षाची कसोटी सिडनीमध्येच खेळवली जाईल. तसेच, ख्रिसमसपूर्वीची कसोटी अॅडलेडमध्ये होईल, तर हंगामातील पहिली कसोटी पर्थमध्ये खेळली जाणार आहे. २०३२ च्या ऑलिंपिकच्या पार्श्वभूमीवर गाब्बा स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्याने पुढील काही वर्षांत तेथे फारसे कसोटी सामने खेळवले जाणार नाहीत. त्यामुळे, २०२७ मधील अॅशेस मालिकेतील एक सामना ब्रिस्बेनच्या गाब्बा स्टेडियमऐवजी पर्थमध्ये खेळवला जाणार आहे.

Protected Content