
नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये ४ मे रोजी संध्याकाळी हवाई दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले असून त्यांना उधमपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. एकाची प्रकृती गंभीर आहे. संध्याकाळी ६.१५ वाजता पुंछमधील शाहसीतार भागात हा हल्ला झाला.

सनई टॉपकडे जाणाऱ्या सुरक्षा दलाच्या दोन वाहनांवर ४ दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यातील एक वाहन हवाई दलाचे होते. हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले. त्याच्या हातात एके असॉल्ट रायफल होती. हवाई दल, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष गरुड दल शोध मोहीम राबवत आहेत. पुंछ हे राजौरी-अनंतनाग लोकसभा मतदारसंघात येते. येथे 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होत आहे.



