रायन्नाच्या पुतळ्यामुळे पिरानवाडीत पुन्हा तणाव

कोल्हापूर वृत्तसंस्था । बेळगावात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद पेटला आहे. पिरणवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच रातोरात संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवल्यानं बेळगावात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे.

संगोळी रायान्ना यांच्या पुतळ्यावरून पुन्हा बेळगावातील मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. कन्नड संघटनांनी मध्यरात्री रायन्ना यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरचं बसवला. रायान्ना यांचा पुतळा इतरत्र हलवा अशी मागणी करत पिरणवाडी गावातील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले आहे.

या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असून या चौकाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. या चौकात संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न काही दिवस सुरू होता. त्याला मराठी भाषिकांचा विरोध आहे. तरीही मध्यरात्री शिवाजी चौकात अचानक संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसविण्यात आला. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर मराठी भाषिक आक्रमक झाले. रस्त्यावर उतरून मोर्चा काढून आंदोलन केले. पोलिसानी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला.

गावात पुतळा बसवण्यात आपला विरोध नाही पण तो शिवाजी चौकात नको अशी भूमिका मराठी भाषिकांनी घेतली आहे. तरीही त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी कर्नाटक सरकारने रातोरात संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसविण्यास परवानगी दिली. .

काही दिवसांपूर्वीच बेळगावातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला होता. पुतळा हटवल्यानंतर मनगुत्ती गावातील गावकरी आक्रमक झाले होते. महाराष्टात कोल्हापूरसह अनेक भागांत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. स्थानिक प्रशासनाने पुतळा पुन्हा बसवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा वाद शमला होता.

Protected Content