ओबीसी आरक्षणावरून विधीमंडळात गदारोळ

 

मुंबई प्रतिनिधी । केंद्र सरकारने ओबीसींचा इंपेरिकल डाटा द्यावा या मागणीसाठीचा ठराव विधीमंडळात मांडण्यात आल्यानंतर विरोधक आणि सत्ताधार्‍यांमध्ये सभागृहात जोरदार संघर्ष झाल्याचे पहावयास मिळाले.

विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून एम्पिरिकल डेटा मागवण्याबाबत ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. या गोंधळातच सभागृहात ठराव मांडण्यात आला. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आवाजी मतदानाने ठराव मंजूर केला. ठराव विधानसभेत पारित होत असताना विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांच्यासह अनेक आमदार वेलमध्ये उतरले. आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थितीचे भान ठेवत आमदार आशिष शेलार यांनी संजय कुटे, गिरीश महाजन यांच्यासह सर्व आमदारांना वेलमधून आपल्या जागेवर नेलं. विधानसभेचे कामकाज १० मिनिटं स्थगित करण्यात आलं.

विधानसभा स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देवेंद्र फडणवीस गेले असताना विरोधी आमदार आणि सत्ताधारी आमदार यांच्यात धक्काबुक्की झाली. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले आहे.

Protected Content