शॅडो कॅबिनेटचा प्रयोग ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरू नये- शिवसेनेची खोचक टीका

मुंबई प्रतिनिधी । मनसेने शॅडो मंत्रीमंडळ नेमल्यावरून शिवसेनेने हा प्रयोग हा खेळ सावल्यांना नाट्यप्रयोग ठरू नये अशी खोचक टीका केली आहे. राजकारणात विनोदाला वावडे नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकाराची खिल्ली उडवली आहे.

राज ठाकरे यांनी मनसेचे शॅडो कॅबिनेट आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनी जाहीर केले आहे. यात सरकारमधील प्रत्येक खाते हे पूर्णपणे काम करत आहे की नाही यावर नजर ठेवली जाणार आहे. यावर आज शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर नजर ठेवण्यासाठी एक शॅडो कॅबिनेट एकमेव आमदार असलेल्या पक्षाने जाहीर केले आहे. हे सरकारच्या चुका दाखवाच, पण सरकारकडून एखादे चांगले काम झाले असल्यास त्यांचे अभिनंदन करावे असेही सांगण्यात आले. मुळात अशा प्रकारचे शॅडो कॅबिनेट कोणी तयार करावे? याबाबत काही संकेत आहेत. हा प्रयोग संसदेतील प्रमुख आणि प्रबळ विरोधी पक्षाने करायचा असतो. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे व तिथे भाजप हा एक प्रबळ विरोधी पक्ष आहे. त्या १०५ आमदारवाल्या पक्षाने शॅडो मंत्रिमंडळ वगैरे बनवले नाही, पण एकमेव आमदारवाल्यांनी शॅडो की काय ते बनवले. आता हे शॅडो म्हणजे नेमके काय ते जरा समजून घेतले पाहिजे. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ आज हयात नाहीत. त्यांनी त्यांच्या भाषणात व लिखाणात युरोपादी देशांतील ङ्गशॅडोफ कॅबिनेटची माहिती अनेकदा दिली आहे. ती रंजक आहे. राज्यातील शॅडोवाल्यांनी ती माहिती समजून घेतलेली दिसत नाही.

यानंतर अग्रलेखात शॅडो कॅबिनेटचा इतिहास देण्यात आला असून पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता शॅडो कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे हा खेळ सावल्यांचा नाट्यप्रयोग ठरू नये. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही व राज्यात विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. शॅडोची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका. हे बरे झाले. अनुभव माणसाला शहाणपण शिकवतो. तो असा कामास येतो. शॅडो मंत्रिमंडळ बनवण्यासाठी त्या संख्येने आमदार किंवा खासदार निवडून आणावे लागतात तसे ते दिसत नाही. पुन्हा शॅडोवाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. शॅडो मुख्यमंत्री हा अधिकृत विरोधी पक्षनेता असतो. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा ‘शॅडो’ राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे ङ्गखेळ सावल्यांचाफ अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे, राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसलं असा टोला या अग्रलेखातून मारण्यात आला आहे.

Protected Content