हर्षोल्लासात भरला भोंगर्‍या बाजार !

चोपडा प्रतिनिधी । सातपुड्याच्या पायथ्याशी होळी सणाचा अविभाज्य घटक असणारा भोंगर्‍या बाजार अतिशय उत्साहात भरविण्यात आला.

आदिवासी संकृतीचे जतन करणारा भोंगर्‍या बाजार पांढरी (अडावद ) सोमवार रोजी हर्षोउल्हासात आणि चैतन्यमयी वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.भोंगर्‍या निमित्त येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते .सातपुडा पर्वताच्या पायथ्था लगतच्या गावासह पाड्या वस्ती वरील हजारो आदिवासी सहकुंटूब येथे आलेले होते.भोंगर्‍या बाजारात लाखों रूपयांची उलाढाल झाली. आदिवासीचे विविध रंगातील आणि ढंगातील पेहराव तसेच ढोल ताश्यांचा गजरातील सामुहिक नृत्य त्यातील विविधता भोंगर्‍या बाजाराचे मुख्य आकर्षण ठरत होते. पंचक्रोशितील अनेक ग्रामस्थांनी भोंगर्‍या बाजारात हजेरी लावली. चोपडा विधानसच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे हस्ते मनाच्या ढोलाचे पुजन करून भोंगर्‍याचा शुभारंभ झाला. यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील, तालुकाप्रमुख मंगला पाटील, उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, संजीव शिरसाठ जिल्हा सरचिटणीस लोक संघर्ष मोर्चा, जयराम पावरा, देवसिंग पावरा, जेतराम बारेला, सौ भावना माळी, सरपंच अडावद, सौ भारती महाजन माजी सरपंच, माजी सरपंच यासु बारेला, गुलाब बारेला, दिनेश बारेला खेलसिंग बारेला, यांसह आदिवासी बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

दुपारी १२ वाजेपासून विविध आदिवासी बांधव आपआपल्या गटाने नृत्य,नाचगाणे आदींच्या कलाविष्कारात सायंकाळ पर्यत दंग झालेले होते. मध्यभागी मोठा ढोल व ताट वाजवत बासरी आणि त्याभोवती युवक युवतींसह अबालवृध्द गोलरिंगण करून नाचत होते. भोंगर्‍या निमित्त येथील बाजारात पाळणे, झुले आलेले होते त्याच्या आदिवासी बाळगोपाळासह तरूण तरूणींनी मनमुराद आनंद घेतला. भोंगर्‍या स्पेशल गुळाची जिलेबी, गोडशेव ,पान ठेल्यावरील कलकत्ता मिठा पान, कुल्फी शितपेय आदी पदार्थासह हातावर गोंधून घेणे,फोटो काढणे ,बँन्टेक्सचे दागिने, साड्या पातळ आदींसह जिवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी आदिवासी बांधवानी भोंगर्‍या बाजारात केली. व्यवसायिकांचाही चांगला व्यवसाय या निमित्ताने झाला.

सातपुड्यातील आणि अन्य ठिकाणी तसेच मध्यप्रदेशातून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षभर काबाडकष्ट करणारे आदिवासी बांधव सर्व देहभान विसरून आज भोंगर्‍यात बेधुंदपणे नाचगाणे करून आपल्या संस्कृतीचे एकप्रकारे जतन करून काही काळ का असेना दुःख आणि दारिद्र विसरून भोंगर्‍याचा आनंद लूटत होते हे विशेष .संध्याकाळी उशिरा पर्यत भोंगर्‍या बाजारातील आदिवासी शैलीतील खास ढोल आणि बासरीचे सूर निनादत होते. सायंकाळी सात वाजेनंतर आलेले हजारों आदिवासी एकमेकांना गुलाल लावून गुळ, फुटाणे ,हार ,कंगण च्या प्रसादाची देवाणघेवाण करून एकमेकांची गळाभेट घेत आपआपल्या पाड्या वस्त्यांकडे मार्गस्थ झालेत. बाजारासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे ,पोलिस उपनिरीक्षक यादव भदाणे, हवालदार जगदीश कोळंबे, कदीर शेख, योगेश गोसावी, मुकेश तडवी, नासीर तडवी, राजश्री बाविस्कर व दंगा नियंत्रण पथकाचे अकरा कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Protected Content