मुक्ताईनगरमध्ये वसुलीसाठी टेंडर, पण सफाईचं टेंडर नाही !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर नगरपंचायतीकडून गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील फुटपाथ विक्रेते आणि इतर व्यवसायिकांकडून नियमित टेंडर व वार्षिक कर वसूल केला जात आहे. मात्र ही वसुली फक्त ‘मुक्ताई चौक’ ते ‘बोदवड चौफुली’ या भागापुरतीच सीमित असल्याचे चित्र दिसून येत आहे, ज्यामुळे नागरीकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहराच्या उड्डाणपुलाच्या पलीकडे असलेल्या व्यवसायिक व फुटपाथ विक्रेत्यांकडूनही दररोज टेंडरचे पैसे घेतले जातात. मात्र या भागात नगरपंचायतीची एकही सफाईगाडी कधीच येत नाही, ना कचरा उचलला जातो. त्यामुळे या परिसरातील व्यवसायिकांनी आता आक्रमक भूमिका घेत, या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

नगरपंचायतीचे संबंधित अधिकारी किंवा सफाई टेंडरधारक यांना विचारणा केली असता, त्यांनी स्पष्ट सांगितले की, “आमचं साफसफाई टेंडर हे केवळ नॅशनल हायवे क्रमांक 6 वर मर्यादित आहे.” मात्र दुसरीकडे वसुली मात्र मुक्ताई मंदिरापर्यंत केली जात आहे. यामुळे वसुली आणि सेवा यामध्ये भयंकर विसंगती असून, शहरातील सामान्य व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

दररोज सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना देखील या भागातील अस्वच्छता आणि दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून केवळ कर वसुली केली जाते, पण मूलभूत सुविधा देण्यात मात्र उदासीनता दिसून येत आहे.

सफाईसाठी नियमित गाड्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, टेंडर वसुली आणि सेवा यामध्ये समतोल राखावा, नगरपंचायतीने सर्व भागांत समान नियम लागू करावेत अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर लवकरच या मुद्द्यावरून मोठा जनआंदोलन उभं राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Protected Content