वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने अधीपरिचारकांच्या बदली संदर्भात काढलेल्या शासन निर्णयाविरोधात वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील अधीपरिचारकांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत अधीपरिचारकांनी शासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सहा वर्षांनंतर सक्तीच्या बदल्या करण्याच्या आदेशामुळे वैवाहिक, कौटुंबिक आणि मानसिक जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
वरणगाव ग्रामीण रुग्णालयासमोर झालेल्या या आंदोलनात महिला अधीपरिचारिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. शासनाने नुकतेच अधीपरिचारकांच्या बदलीसंदर्भात आदेश पारित केले असून त्यानुसार सहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी एका ठिकाणी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांचे नियोजन विस्कळीत होणार असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, अनेक अधीपरिचारिका आपल्या कुटुंबीयांच्या जबाबदाऱ्या सांभाळत आरोग्य सेवा बजावत आहेत. अचानक बदली झाल्यास मुलांचे शिक्षण, पती-पत्नीचे समन्वय, वृद्ध पालकांची काळजी तसेच मानसिक तणाव अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी अधीपरिचारिका शितल बोदडे आणि पल्लवी सुरवाडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शासनाच्या निर्णयामुळे कर्मचारी वर्गामध्ये असंतोष निर्माण झाल्याचे सांगितले. कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या अधीपरिचारकांवर आता अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून न घेता घेतलेल्या निर्णयामुळे आरोग्य विभागातील वातावरण तणावपूर्ण बनत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आंदोलनादरम्यान शासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही अधीपरिचारकांनी या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. अचानक बदलीमुळे अनुभवी कर्मचारी कमी झाल्यास रुग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो, असेही आंदोलकांनी सांगितले.



