सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या काँग्रेसच्या तिन्ही नवीन जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली असून यात जळगाव पूर्व म्हणजेच रावेर लोकसभा क्षेत्राच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी युवा नेते धनंजय शिरीष चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने देशभरातील जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात येणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. या अनुषंगाने मध्यंतरी केंद्रीय पथक देखील जिल्ह्यात येऊन गेले होते. तर मावळते जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना आधी पक्ष एकच जिल्हाध्यक्ष देत असला तरी आता जळगाव पूर्व, जळगाव पश्चीम आणि महानगर असे तीन जिल्हाध्यक्ष देणार असल्याची माहिती दिली होती. या अनुषंगाने रात्री उशीरा काँग्रेस पक्षाच्या वतीने नवीन जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

यात जळगाव पूर्व विभाग म्हणजेच रावेर लोकसभा क्षेत्राच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी धनंजय शिरीष चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. यात त्यांना अपयश आले असले तरी त्यांनी सातत्याने जनतेशी संपर्क ठेवला असून पक्षांची ध्येयधोरणे शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे काम केले आहे. याच कामाची पावती म्हणून त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या जळगाव जिल्ह्यातील इतिहासात ते पक्षाचे सर्वात तरूण जिल्हाध्यक्ष ठरणार आहेत. धनंजय चौधरी यांना उज्वल राजकीय वारसा असून धनाजी नाना चौधरी, मधुकरराव चौधरी आणि त्यांचे पिताजी शिरीषदादा चौधरी यानंतर त्यांना आता मोठ्या पदावर काम करण्याची संधी लाभली आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने यासोबत, जळगाव पश्चीम म्हणजेच जळगाव लोकसभा क्षेत्राच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी ॲड. अविनाश भालेराव यांच्याकडे सोपविली आहे. ते पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी असल्याने त्यांची जिल्हाध्यक्षपदावर निवड करण्यात आली. तर जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपद हे जमील शेख यांना जाहीर करण्यात आले आहे. या माध्यमातून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी भाकरी फिरवत नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येत आहे.



