Home Agri Trends मुक्ताईनगर तालुक्यात १० ते १२ गावांना पावसाने झोडपले; आ. चंद्रकांत पाटील बांधावर

मुक्ताईनगर तालुक्यात १० ते १२ गावांना पावसाने झोडपले; आ. चंद्रकांत पाटील बांधावर


मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर मतदारसंघात मंगळवार २७ जानेवारी रोजी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे तालुक्यातील कोथळी, चांगदेव, चिंचोल, मानेगाव, वढवे यांसह उचंदे, पंचाना, मेळसांगावे, दुई, सुकळी आणि खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. या आस्मानी संकटामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा पूर्णपणे हतबल झाला असून, अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.

या अवकाळी पावसामुळे गहू आणि मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे उभी पिके आडवी झाली असून, दाणा भरण्याच्या स्थितीत असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ शेतीच नव्हे, तर ग्रामीण भागातील अनेक कच्च्या घरांवरील पत्रे उडून गेल्याने आणि भिंती कोसळल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपला नियोजित दौरा बाजूला सारून थेट नुकसानग्रस्त गावांना भेटी दिल्या. त्यांनी कोथळी, चांगदेव आणि परिसरातील शेतांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना धीर दिला. “संकटाच्या काळात मी तुमच्या सोबत आहे, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदारांनी तातडीने तहसीलदार आणि कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी पाचारण केले. नुकसानग्रस्त भागाचे २४ तासांच्या आत पंचनामे करण्याचे स्पष्ट आणि कडक आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. कोणताही शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound