मूलबाळ होण्यासाठी पत्नीवर जादूटोण्याचा प्रयत्न; तहसीलदाराला अटक

नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तहसीलदार पतीकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप पत्नीने केला आहे. विशेष म्हणजे केवळ मूलबाळ होत नसल्यामुळे पत्नीवर अत्याचार होत असल्याचा दावा करत, तिच्यावर पिस्तूल रोखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. यासोबतच जादूटोण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याचे आरोप तिने केले आहेत. हे प्रकरण नांदेड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असून आरोपी तहसीलदार अविनाश शेंबटवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, दीड वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात तिचं अविनाश शेंबटवाड यांच्याशी लग्न झालं होतं. विवाहानंतर काही दिवसातच सासरच्यांकडून आणि पतीकडून शारीरिक व मानसिक त्रास सुरू झाला. सतत वाद, टोमणे, आणि काही ना काही कारण काढून तिच्यावर हात उचलला जाऊ लागला. एकदा तर कामावर असताना पतीने तिच्यावर पिस्तूल रोखल्याचा आरोप तिने केला आहे.

तक्रारीनुसार, मूलबाळ न झाल्यामुळे सासरच्यांनी तिच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला. ही कृती महाराष्ट्रातील अघोरी प्रथा आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हेगारी स्वरूपाची असून त्यावर कठोर शिक्षा होऊ शकते.

11 एप्रिल रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर, 13 एप्रिलला अविनाश शेंबटवाड यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत त्यांच्या आई-वडील व डॉक्टर असलेल्या दोन भावांवरही कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अविनाश शेंबटवाड यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे आणि प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे नांदेडमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एका उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्याकडून असा वर्तन अपेक्षित नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, असे उच्चपदस्थ अधिकारी गुन्ह्यांत अडकताना दिसत असल्याने प्रशासनाचीही प्रतिमा मलीन होत आहे.

Protected Content