लॉस एंजेलिसमधील फेअरप्लेक्स येथे खेळवले जातील ऑलिंपिक क्रिकेटचे सामने

लॉस एंजेलिस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | १२८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर क्रिकेट पुन्हा एकदा ऑलिंपिकच्या मैदानावर झळकणार आहे. लॉस एंजेलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला गटांमध्ये प्रत्येकी ६ संघ सहभागी होणार आहेत. हे सामने टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार असून, प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश असेल

लॉस एंजेलिस २०२८ च्या आयोजन समितीने दक्षिण कॅलिफोर्नियामधील पोमोना येथील ‘फेअरप्लेक्स’ या ऐतिहासिक ठिकाणी क्रिकेट सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मैदान लॉस एंजेलिसच्या पूर्वेस सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असून, ५०० एकरमध्ये पसरलेले आहे. १९२२ पासून येथे लॉस एंजेलिस काउंटी फेअरचे आयोजन केले जाते. या ऐतिहासिक निर्णयावर प्रतिक्रिया देताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे अध्यक्ष जय शहा म्हणाले, “लॉस एंजेलिस २०२८ मध्ये क्रिकेटच्या आयोजनासाठी फेअरप्लेक्सची निवड ही एक महत्त्वाची पायरी आहे. क्रिकेटच्या ऑलिंपिकमधील पुनरागमनासाठी आम्ही उत्साहित आहोत.”

याआधी क्रिकेट फक्त एकदाच – १९०० मध्ये – ऑलिंपिकमध्ये समाविष्ट झाले होते. त्या वेळी ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोन संघांमध्ये दोन दिवसांचा सामना खेळवण्यात आला होता. त्यामुळे २०२८ मध्ये होणारे टी-२० सामने हे क्रिकेटसाठी नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहेत. २०३२ मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्या वेळेस गॅबा स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवला जाईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत पार पडलेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान क्रिकेटला मिळालेल्या प्रतिसादामुळे ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला. न्यू यॉर्कमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या स्टेडियमपासून ते लॉडरहिल आणि ग्रँड प्रेरी स्टेडियममधील उत्साहवर्धक भारत-पाकिस्तान सामन्यांपर्यंतचा प्रवास क्रिकेटच्या जागतिक विस्ताराचे प्रतीक ठरला.

Protected Content