पुणे प्रतिनिधी | शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी घोटाळ्याची व्याप्ती अतिशय भयावह प्रमाणात पसरल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केलं असल्याची माहिती समोर आल्याने खळबळब उडाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न झालं आहे. यामुळे आता गैरव्यवहार करून शिक्षक बनलेल्यांचा शोध घेऊन त्यांना देखील या प्रकरणात आरोपी बनविण्यात यावे अशी मागणी होत आहे.
२०१८ मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. २०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थींना पात्र करण्यात आले. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र ठरल्याचं समोर आलं आहे. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले आहे.
काही दिवसांपुर्वी २०१३ पासून टीईटीच्या मार्फत भरती झालेल्या राज्यातील सर्व शिक्षकांची प्रमाणपत्रे खरी आहेत की नाही याची पडताळणी करायचं शिक्षण परिषदेने ठरवलं होतं. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, महापालिकाकडून चालवल्या जाणार्या शाळांना तसे आदेश देण्यात आले. पुणे सायबर पोलिस सध्या २०१८ आणि २०२० मधे झालेल्या टी ई टी घोटाळ्याचा तपास करत आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे पाच अधिकारी सायबर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन मदत करत आहेत. तुकाराम सुपे आणि सहकार्यांच्या कॉम्प्युटर्समधून मिळालेली माहिती, वेगवेगळ्या एजंट्सकडून मिळालेली माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या माहितीशी पडताळून पाहिल्यावर सायबर पोलीस या निष्कर्षांपर्यंत पोहोचले आहेत.