१५० ग्रामीण रुग्णालयात कर्करोग निदान होणार

 

मुंबई : वृत्तसंस्था ।ग्रामीण भागातही  कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून, योग्य वेळेत निदान झाल्यास कर्करोगाला आळा घालणे शक्य होईल. आरोग्य विभाग  यासाठी तब्बल १५० ग्रामीण रुग्णालयात स्तन, तोंडाचा तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाच्या निदानाची व्यवस्था करणार आहे.

महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामीण भागात तंबाखू सेवनामुळे पुरुष तसेच स्त्रीयांमध्ये तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण मोठे आहे.  स्तनाचा तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाणही राज्यात सर्वाधिक आहे. आरोग्य विभागाने २०१७ पासून कर्क रुग्णांवरील उपचाराचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यास सुरुवात केली आहे. काही जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी व्यवस्था करण्यात आली आहे. 

 टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने कॅन्सर वॉरियर्स संकल्पनेच्या माध्यामातून काही हजार कर्करुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. शहरी भागातील रुग्णांमध्ये जी जागरुकता व आरोग्य सुविधा उपलब्ध असते तशी ती ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे बहुतेकवेळा शेवटच्या टप्प्यात कर्करोग झाल्याचे रुग्णाच्या लक्षात येते. अशा रुग्णांवर उपचार करणे हे एक आव्हान ठरते. यामुळे वेळेत कर्करोगाचे निदान व्हावे यासाठी आरोग्य विभागाने तब्बल १५० ग्रामीण रुग्णालयांमध्ये कर्करोग निदान केंद्र सुरु करण्याची योजना आखली आहे. 

यासाठी या सर्व दीडशे रुग्णालयात स्तन, गर्भाशय तसेच तोंडाचा कर्करोगाचे निदान करणारी यंत्रणा लागू केली जाणार आहे. यात सोनोग्राफी मशिनमध्ये ब्रेस्ट प्रोब, बायोप्सी सुविधा तसेच हिस्टोपॅथॉलॉजी सुविधा दिली जाणार आहे.  कर्मचाऱ्यांना यासाठीचे  प्रशिक्षण दिले जाणार आहे. १२ कोटी रुपये खर्चाची ही योजना असून याच्या अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील कर्क रुग्णांचे वेळेत निदान होईल. तसेच उपचाराचीही व्यवस्था करता येईल.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार भारतात जवळपास साडेबारा लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सुमारे आठ लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला असून देशात २५ लाख रुग्णांवर आजघडीला उपचार सुरु आहेत. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च’ च्या अहवालानुसार देशात वेगाने वाढणारे कर्करुग्णांचे प्रमाण लक्षात घेता आणखी ५५० कर्करोग उपचार केंद्रांची आवश्यकता आहे. तसेच किमान पाच हजार कॅन्सर तज्ज्ञाची गरज आहे. २०२० मध्ये तंबाखू सेवनामुळे सुमारे सव्वा दोन लाख पुरुष व ९३ हजार महिलांना कर्करोग झाला. स्तनाच्या कर्क रूग्णांची संख्या १ लाख ६५ हजार तर गर्भाशयीच्या कर्करुग्णांची संख्या सव्वा लाख एवढी आहे. ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने रुग्णांचे वेळेत निदान होत नसल्यामुळे आरोग्य विभागाने तोंड, स्तन व गर्भाशयाच्या कर्करुग्णांचे निदान करण्यासाठी व्यापक योजना हाती घेतली असून दीडशे ग्रामीण रुग्णालयात कर्करोग निदान केंद्र आगामी वर्षात सुरु केली जाणार आहेत.

Protected Content