जळगाव विमानतळावर आयएफआर सुविधेची खासदारांची मागणी

khasdar

जळगाव प्रतिनिधी । येथील विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरविण्यासाठी आवश्यक असलेली इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रूट (आयएफआर) ही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हावी, अशी मागणी खा. रक्षा खडसे व खा.उन्मेष पाटील यांनी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हीएशन अरुण कुमार यांना (दि.5) भेटून केली आहे.

जळगाव विमानतळावर सूर्यास्तानंतर अंधार होत असल्याने व्हीएफआर प्रणाली लागू असलेल्या विमानतळावर विमान उतरवता येत नाही. जर आयएफआर प्रणाली लागू असेल, तर ही परवानगी दिली जाते. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेंतर्गत जळगाव ते इतर शहरे मुंबई, अहमदाबाद अशा हवाई मार्गांवर प्रवासी विमान वाहतूक सुरू आहे. सध्या जळगाव विमानतळावर फक्त दिवसा विमान उतरविले जाते. काही वेळा खराब हवामान किंवा अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसतो. विमान उतरवता येत नाही, विमानाला इतर विमानतळावर उतरवले जाते. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. मागील महिन्यात अनेकदा विमान सेवा रद्द करण्यात आली किंवा दुसऱ्या विमानतळावर विमान उतावरण्यात आले. त्यामुळे आयएफआर ही सुविधा जळगाव विमानतळावर कार्यान्वित होणे आवश्यक आहे.

जळगाव विमानतळावरील व्हीएफआर प्रणाली बदलून आयएफआर करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) कडे अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी खा.रक्षा खडसे व खा.उन्मेष पाटील यांनी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हीएशन अरुण कुमार यांची भेट घेतली.

Protected Content