जळगाव प्रतिनिधी । शहरातील पंचमुखी हनुमान मंदीराजवळ एका तरूणाचा मागील भांडणाच्या कारणावरून चाकूने वार करून खून केल्याची घटना मे 2015 मध्ये घडली होती. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आज पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर एक जणाची निर्दोष मुक्तता केली आहे.
असा केला होता खून
17 फेब्रुवारी 2015 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सनी उर्फ चालीस वसंत पाटील, चिंग्या उर्फ चेतन सुरेश आळंदी आणि फिर्यादी भूषण सुरेश पाटील यांच्यात भांडण झाले होते. या भांडणाच्या वादातून चिंग्या व त्याच्या पाच साथीदारांनी 14 मे 2015 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास शहरातील पंचमुखी हनुमान मंदीराजवळ भूषण पाटील यांचा मोठा भाऊ चंद्रकांत पाटील याचा चाकूने भोसकून निर्घुण खून केला होता.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात सहाही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे (वय-32) रा. गणेशवाडी, बोबड्या उर्फ गोल्या उर्फ लखन दिलीप मराठे (वय-24) रा. शिवाजी नगर, सनी उर्फ चालीस वसंत पाटील (वय-24) रा.गाडगेबाबा नगर, ललित उर्फ सोनू गणेश चौधरी (वय-24) रा. हरेश्वर नगर, लक्ष्मण दिलीप शिंदे (वय-26) रा. शिवाजी नगर व सागर वासुदेव पाटील (वय-24) रा. ईश्वर कॉलनी या सहा जणांवर दोषारोप दाखल करण्यात आले होते. तर भैरवी काम पाहणारे आर.बी.सैदाणे, केस वॉच सचिन चौधरी तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी तर आरोपींतर्फे ॲड. प्रकाश पाटील, ॲड.सागर चित्रे, ॲड.श्री. नाईक, ॲड. व्ही.आर.ढाके, ॲड.पंकज अत्रे, आणि ॲड. हेमंत सुर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.
11 साक्षिदार तपासले
या खून प्रकरणात एकुण 11 साक्षिदार तपासण्यात आले होते. यात फिर्यादी भूषण सुरेश पाटील, प्रसन्न अशोक मंडोरे, वडील सुरेश अभिमन पाटील, पंच शाम अभिमान घाट, मंगल धनसिंग पाटील, गोपाळ ओंकार पाटील, बापू रूपचंद चौधरी, डॉ.सचिन दगडू अहिरे, सतीश विठ्ठल गद्रे, डॉ. हिरा आनंद दामले आणि जगदीश संतोष देवरे यांची साक्ष तपासण्यात आली होती. या खटल्याच्या कामकाजाला खऱ्या अर्थाने 30 जानेवारी 2018 पासून सुरुवात झाली होती.
असे आहे शिक्षेचे स्वरूप
जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश श्री. सानप यांनी 11 साक्षीदार आणि सरकारी वकील व आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून सहा पैकी पाच जणांना दोषी ठरवले. त्यात चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे (वय-32) रा. गणेशवाडी, बोबड्या उर्फ गोल्या उर्फ लखन दिलीप मराठे (वय-24) रा. शिवाजी नगर, सनी उर्फ चालीस वसंत पाटील (वय-24) रा.गाडगेबाबा नगर, ललित उर्फ सोनू गणेश चौधरी (वय-24) रा. हरेश्वर नगर, व सागर वासुदेव पाटील (वय-24) रा. ईश्वर कॉलनी पाचही जणांना भादवि कलम 302, 120 ब 149 अन्वये जन्मठेप व 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्याचा साधा कारावास, तसेच 307, 120 ब, 149 अन्वये 5 वर्षाची सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद आणि 143, 149, 323, 149 अन्वये दोन महिन्यांची साधी कैद सुनावण्यात आली. आरोपींना सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. तर लक्ष्मण दिलीप शिंदे (वय-26) रा. शिवाजी नगर याला परिस्थितीजन्य पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले आहे.