चाळीसगाव येथे शेतकऱ्यांना भरपाईसाठी समता सैनिक दलाचा मोर्चा

samata sainik dal

चाळीसगाव, प्रतिनिधी | राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्याच्या हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अन्न पुरवणारा शेतकरी व त्याचा परिवार अत्यंत बिकट अवस्थेत आला आहे. त्याच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी. त्याचप्रमाणे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेत मजुरांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करीत येथील समता सैनिक दलाच्या वतीने आज (दि.२) तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता.

 

मुसळधार पाऊस सुरु असतांनाही मोर्चा शिस्तबद्ध रीतीने चालत होता हे विशेष. तहसील कचेरी येथे समारोप करतांना मोर्चाचे नेतृत्व करणारे धर्मभूषण बागूल यांनी शेतकऱ्यावर आलेल्या संकटाची जाणीव करून दिली. शेतकऱ्यांना विना विलंब व कोणतीही तांत्रिक अडचण न दाखवता भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक हे निवेदन घेण्यासाठी उपस्थित होते. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रु ५० हजार भरपाई देण्यात यावी व शेतमजुराला देखील उदरनिर्वाह करीता रोजगार बुडीत अकस्मात निधीची तरतूद करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

मोर्चाचे आयोजन समता सैनिक दलाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील जाधव यांनी केले होते. पितांबर झाल्टे, सचिन गांगुर्डे, विष्णू जाधव, दीपक बागूल, जीवन जाधव, बाबा पगारे, भगवान भालेराव, विशाल केदारे, बाबा चव्हाण, आदित्य चव्हाण, योगेश पांचाळ, विशाल पगारे, गोपाळ भालेराव, संतोष जाधव, आकाश चव्हाण, यांनी मोर्चासाठी परिश्रम घेतले. यावेळी संभा आप्पा जाधव वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष सुरेश पगारे यांनी मोर्चात सहभाग घेऊन पाठिंबा दिला होता. यावेळी सरपंच भाऊसाहेब मोरे, महेंद्र जाधव, श्री. खैरे, मनोज जाधव, पृथ्वीराज जगताप, शिवा शिंदे, बबलू जाधव, शरद जाधव, किरण मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Protected Content