ग. स. चे बाजीगर . . .उदय पाटीलच ‘किंग’ आणि ‘किंगमेकर’ !

जळगाव-राहूल शिरसाळे | अतिशय ख्यातनाम लौकीक असणारी सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग. स. सोसायटीत सहकार गटाने ऐनवेळी केलेली खेळी यशस्वी होऊन त्यांनी सत्ता काबीज केली आहे. या सर्व घडामोडींमध्ये उदय पाटील यांचा मुरब्बीपणा स्पष्टपणे अधोरेखीत झाला असून ते ग.स.चे खर्‍या अर्थाने बाजीगर ठरले आहेत.

ग. स. सोसायटीची यंदाची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली. आधी देखील सोसायटीत फाटाफूट, आयाराम-गयाराम, भ्रष्टाचार आदींची अनेक प्रकरणे घडली असून यातून अनेकदा गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. अलीकडच्या काळात तर अपहाराची अनेक प्रकरणे गाजल्यामुळे ही संस्था मोठ्या प्रमाणात बदनाम झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेत प्रचंड प्रमाणात अस्थैर्य असल्याचे दिसून येत आहे. यातच कोविडमुळे संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर निवडणूक जाहीर होताच मोठे अर्थकारण असणार्‍या या संस्थेची सूत्रे हाती घेण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या. यंदा तब्बल पाच पॅनल रिंगणात उतरल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत होते. आणि झालेदेखील तसेच.

ग.स. सोसायटीच्या अलीकडच्या सुमारे तीन दशकांपासून सहकार आणि लोकमान्य या दोन गटांमध्येच लढत रंगत असे. यंदा देखील हे दोन्ही पॅनल रिंगणात होते. तर स्वत: तीन अपत्यांमुळे अपात्र झाले असतांनाही मनोज पाटील यांनी सुनील सूर्यवंशी, प्रतिभा सुर्वे यांच्यासारख्या मातब्बरांना सोबत घेऊन लोकसहकार गटाची निर्मिती केल्याने ही लढत खूप चुरशीची झाली. तर रावसाहेब पाटील यांनी देखील प्रगती शिक्षक सेनेच्या माध्यमातून दावा दाखल केला.

या वर्षाच्या निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर करण्यात आला. खुद्द उदय पाटील यांनी आजचय पत्रकार परिषदेत विरोधकांनी दीड कोटी रूपये वाटल्याचा धक्कादायक आरोप केला. यंदाच्या निवडणुकीत पैठणींची वाटपही चांगलीच गाजली. निकालाच्या दिवशी पहिल्या टप्प्यात थोडे मागे पडलेल्या सहकारने शेवटच्या टप्प्यात जोरदार आगेकूच केली. तरी त्यांना बहुमत मिळाले नाही. दोन जागा कमी पडत असल्याने सत्तेच्या चाव्या लोकसहकार आणि प्रगती शिक्षक पॅनलच्या हातात असल्याचे मानले जात होते. तथापि, उदय पाटील यांनी अतिशय मुरब्बीपणे लोकसहकारचे रवींद्र सोनवणे आणि ज्ञानेश्‍वर सोनवणे या दोन गटांना गळाशी लावले. शेवटच्या टप्प्यात लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेना पॅनलने एकत्र येण्याचा निर्णय घेतला असला तरी तोवर खूप उशीर झालेला होता. उदय पाटील यांनी तोवर ग.स. सोसायटीत पुन्हा सत्तेवर येण्याची तजवीज करून ठेवली होती. आणि घडले देखील तसेच !

ग. स. सोसायटीमध्ये तब्बल पाच वेळेस निवडून आलेले उदय पाटील हे महापालिकेत अधिकारी आहेत. बहुतांश शिक्षक संचालक असलेल्या ग.स. मध्ये ते दुसर्‍यांदा अध्यक्ष झाले असून याआधी ते तीन वेळेस उपाध्यक्ष झालेले आहेत. अर्थात, इतका प्रदीर्घ अनुभव असणारा कोणताही सदस्य सध्या तरी सोसायटीच्या संचालकांमध्ये नाही. या अनुभवाचा आता संस्थेला लाभ व्हावा हीच अपेक्षा. ग.स. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी झालेला गोंधळ हा संस्थेचा नावलौकीक धुळीस मिळवणारा ठरला असतांना उदय पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांवर जबाबदारीचे खूप मोठे ओझे असल्याची बाब देखील त्यांना समजून घ्यावी लागणार आहे. कारण, अगदी हाता-तोंडाशी आलेला विरोधकांचा घास हिरावून घेतल्यामुळे सहकारला वेळोवेळी प्रखर विरोध होईलच. तसेच, आजच्या गोंधळानंतर दोन्ही गटांमधील खुन्नस ही वैयक्तीक वादांमध्ये परिवर्तीत होण्याचा धोका देखील लक्षात घ्यावा लागणार आहे.

Protected Content