जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विनापरवाना आणि क्रूरपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत वाहनातील गुरांची सुटका करण्यात आली असली, तरी एका अडीच वर्षीय वासराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही कारवाई जळगाव तालुक्यातील भोकर येथे घडली असून, या प्रकरणी वाहनचालक आणि गुरे मालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भोकर येथे एका ट्रकमधून (क्रमांक जीजे ०३, बीडब्ल्यू ८७५६) गुरांची वाहतूक होत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता, चालकाकडे गुरांची वाहतूक करण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे, वाहनात पाच गायी आणि सहा लहान वासरे अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयीपणे बांधून कोंबलेली होती. एवढेच नाही, तर त्यापैकी एक अडीच वर्षीय वासरू मृतावस्थेत आढळून आले.
या गंभीर प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कोळी यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रकचालक रामजी रणछोड धोंडा (वय २३, रा. हाडाखेड, जि. धुळे) आणि गुरे मालक तेजस शरद म्हस्के (वय २६, रा. वाघनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैध गुरे वाहतुकीचा आणि त्यामध्ये जनावरांशी होणाऱ्या क्रूर वर्तनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश पाटील करत आहेत.